कधी वाटे होऊनि घार उंच नभी उडावे
परी मग होऊनि चिऊताई ती भूमीस बिलगावे
कधी वाटे होऊनि जलधि वाहतच जावे
क्षितिजापाशी घेऊनि विसावा सूर्यतेज पाहावे
अनिल तळपता तो, येईल हळुवार एक झुळूक
स्पर्श शीतल होता मग ओठांवर अलगद स्मित यावे
वरुणराजाची कधी होऊनि राणी न्हाऊन निघावे
स्वार होऊनी घोड्यावर मग राजनिशास भेटावे
कधी वाटे त्या स्वप्नामध्ये लहानगे व्हावे
मांडुनी खेळ बाहुल्यांचा पून्हा जगही विसरुनी जावे
वसंताची चाहूल होता कानी कूजन यावे
सप्तसुरांशी होऊनही सलगी गीत कसे छेडावे?
कधी वाटे हरवुनी जावे मन तेथेच रमवावे
असेल कुणी स्वर्गापरी जे मायेने पाझरावे
पाखरांसमवे होऊनि भवरा मनही नाचत गावे
सुरेख कुसुमनक्षी पाहता वधुतेजाने उजळावे
नकळत येती आसवे चक्षु मग हळूच लपवावे
साठवुनी ओलावा हृदयात अन मधाळ हसावे